श्लोक ४
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
अन्वय-अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, च =
आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे
असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, च = आणि, विराटः =
विराट, च = तसेच, द्रुपदः = द्रुपद, महारथः = महारथी,
अर्थ-“येथे या युद्धात प्रचंड धनुष्य धारण केलेले भीमार्जुन,युयूधान(सात्यकी),
विराट आणि द्रुपदासारखे महारथी आहेत.”
स्पष्टीकरण- इथून पुढचे २-३ श्लोक हे युद्ध भूमीतील योद्ध्यांचा परिचय करून देणारे
आहेत.
युयूधान – (सात्यकी) यादवांच्या युद्धात ह्याने भगवान श्रीकृष्णांच्या रथाचे सारथ्य
केले होते. पण या युद्धात स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाल्याने तो योद्धा
म्हणून पांडवांच्या बाजूने सामील झाला होता. पुढे शैब्य हे देखील नाव येते तो शब्दकोशात
पहिला असता शैनेय हा शब्द नजरेस पडतो.त्याचाही अर्थ “सात्यकी” असाच दिलाय.
याचाच अर्थ सात्यकी निरनिराळ्या नावांनी ओळखला जात असे.
विराट – एक वर्षाच्या अज्ञातवासात पांडव विराटाकडेच होते. पांडवांचा शोध घेण्यासाठी
याच्याच गायी कौरवांनी पळविल्या.पण दुर्दैवाने तो अज्ञातवासाचा शेवटचा दिवस असल्याने
अर्जुनाने शरसंधान करून सर्वांना पळवून लावले.
द्रुपद – द्रौपदी व धृष्टद्युम्न हे दोघेही याला अग्निदेवतेच्या प्रसादाने प्राप्त
झालेले होते. त्याचे आणि द्रोनाचार्यांचे अध्ययन द्रोणाचार्यांचे वडील गुरु भारद्वाज
ह्यांच्याकडे झाले. त्यावेळी “कधीही गरज भासली तर माझ्याकडे या “असे द्रोणाचार्यांना
आश्वासन दिले. पुढे द्रुपद राजा झाला आणि भारद्वाजांच्या मृत्यूनंतर द्रोणाचार्यांचे
लग्न कृपाचार्यांची बहिण कृपी हिच्यासोबत झाले, कालांतराने हलाखीच्या परिस्थितीतून
वाट मिळावी म्हणून द्रोणाचार्य द्रुपदाकडे गेले. पण द्रुपदाने ओळखही न दाखवता अपमानित
करून विन्मुख पाठवले.
महारथी – जो एकावेळी १०,००० योद्ध्यांशी युद्ध करतो.त्यापेक्षा कमी योद्ध्यांशी लढतो
तो-अतिरथी
१००० योद्ध्यांशी एकाच वेळी युद्ध करणारा-रथी, (यावरूनच “राठी” हे आडनाव
आल्याचे परमपूज्य श्री गुरुदेवांनी मार्गदर्शन केले आहे.)
आणि १००० पेक्षा कमी योद्ध्यांशी लढणारा-अर्धरथी
सेनेची रचना- एक रथ + एक हत्ती + ३ घोडे + ५ पायिक=”१ पत्ती” म्हणजेच एक
सारथी आणि एक रथी,एक हत्ती एक माहूत व एक योद्धा असा हिशोब धरला तर एका पत्तीचे मनुष्यबळ
१२. ३ पत्तींचे एक सेनाप्रमुख (मनुष्यबळ ३६),३ सेनाप्रमुखांचे एक “गुल्म”(मनुष्यबळ
१०८), ३ गुल्मांचा एक “गण”(मनुष्यबळ ३२४), ३ गणांची एक “वाहिनी”(मनुष्यबळ
९७२), ३ वाहिन्यांची “ १ पतना” (मनुष्यबळ २९१६) ३ पतनांची “१ चमू”(मनुष्यबळ
८७४८) ३ चमूंची एक “अनाकिनी” (मनुष्यबळ २६,२४४), १० अनाकिनी म्हणजे १ अक्षौहिणी
(मनुष्यबळ २,६२,४४०) आणि १८ अक्षौहिणी सैन्यातील एकूण मनुष्यबळ ४७,२३,९२० होते. इतक्या
सगळ्या योद्ध्यात युद्धाच्या अखेरीस ५ पांडव,भगवान श्रीकृष्ण ,सात्यकी व धृष्टद्युम्न
याचा सारथी असे ८ पांडव पक्षातील तर अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य असे तिघे मिळून
केवळ ११ जण जिवंत राहिले.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।